अ‍ॅस्टर हॉस्पिटलमध्ये ब्रेन-डेड रुग्णाच्या अवयवदानातून लिव्हर, किडनींचे प्रत्यारोपण ; तीन रुग्णांना जीवदान

कोल्हापूर – निपाणी येथे रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या निखिल नितीन बोंगाळे यांना उपचारासाठी कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्यांचा ब्रेन-डेड झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी बोंगाळे कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. अवयवदानाच्या प्रक्रियेसाठी निखिल यांना अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

यावेळी अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रक्रियेतून लिव्हर आणि दोन्ही किडनींचे अवयवदान करण्यात आले. दान करण्यात आलेले लिव्हर आणि एक किडनी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची वैद्यकीय टीम अवयव स्वीकारण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाली होती. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडॉर तयार करून हे अवयव वेळेत पुण्यात पोहोचविण्यात आले. या अवयवांमुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील दोन रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

दरम्यान एक किडनी अ‍ॅस्टर हॉस्पिटलमध्येच एका रुग्णाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी वापरण्यात आली. अशा प्रकारे या अवयवदानातून तीन रुग्णांना जीवदान मिळाले आहे. या अवयवदान प्रक्रियेत डॉ. अजय केणी (वैद्यकीय सेवा प्रमुख), डॉ. धनसागर वाकळे (युरोलॉजिस्ट), डॉ. युवराज सावंत (नेफ्रोलॉजिस्ट), डॉ. भूपेंद्र पाटील (व्हॅस्क्युलर सर्जन), डॉ. मन्सूर अली खान (न्यूरोसर्जन), डॉ. अमोल कोडोलीकर (अ‍ॅनेस्थेटिस्ट), डॉ. मयुरा पुजारी (अ‍ॅनेस्थेटिस्ट) आणि डॉ. अभिजीत गवळी (अ‍ॅनेस्थेटिस्ट) तसेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमचे योगदान लाभले. संपूर्ण अवयवदान प्रक्रियेसाठी पुणे विभागाच्या मुख्य प्रत्यारोपण समन्वयक डॉ. आरती गोखले यांच्या मार्गदर्शनासह संबंधित पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले.

Scroll to Top