आरोग्य

परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक : कसबा बावडा सेवा रुग्णालयात ‘यलो फिव्हर’ लसीकरण केंद्र सुरू होणार..!

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – जिल्ह्यातील नागरिकांना तसेच परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर मिळाली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील सेवा रुग्णालयात ‘यलो फिव्हर’ लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
‘यलो फिव्हर’ लसीकरण केंद्राच्या स्थापनेसाठी सेवा रुग्णालयाकडून आवश्यक परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य कार्यालयात सेवा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
या केंद्रासाठी यलो फिव्हर लसींचा पुरवठा केंद्र शासनामार्फत केंद्रीय संशोधन संस्था, कसौली यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. लसींच्या खरेदीसाठी सुरुवातीला संस्थेला स्वतःच्या निधीतून आर्थिक तरतूद करावी लागणार असून, त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रतिपूर्ती पद्धतीने लसींचा पुरवठा केला जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावलीनुसार सुरक्षित लसीकरण सेवा सुनिश्चित करणे या दृष्टीने सेवा रुग्णालयातील यलो फिव्हर लसीकरण केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top