कोल्हापूर : जिल्ह्यातील औद्योगिक व व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या ईएसआयसी (ESIC) हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत, संबंधित आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम तातडीने राबविण्याची मागणी शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेने केलीय. यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालय आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) कोल्हापूर शाखा कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींसह कोल्हापूर शहरातील प्रमुख व्यापारी पेठा, हॉटेल्स आणि खासगी रुग्णालयांमधील कामगारांच्या सामाजिक व आरोग्य सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटलंय. पात्र कामगारांची ईएसआयसीमध्ये नोंदणी न करणे, कंत्राटी व रोजंदारी कामगारांची नावे नोंदीतून वगळणे तसेच वेतनातून विम्याची कपात करूनही कामगारांना विमा क्रमांक आणि पहचान कार्ड न देणे, अशा प्रकारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
कर्मचारी राज्य विमा कायद्यानुसार पात्र कामगारांना वैद्यकीय उपचारांसह विविध सामाजिक सुरक्षा लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नोंदणीतील अनियमिततेमुळे कामाच्या ठिकाणी अपघात, गंभीर आजार किंवा प्रसूतीच्या काळात मिळणाऱ्या लाभांपासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना वंचित राहावे लागत असल्याचा दावा संघटनेने केलाय.
जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रांतील पात्र आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, मस्टर रोल, वेतन नोंदवही आणि बँक खात्यातील वेतन व्यवहारांची पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीय. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८ मधील लागू तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच सर्व पात्र कामगारांची नोंदणी करून त्यांना तातडीने पहचान कार्ड उपलब्ध करून द्यावे, असेही निवेदनात म्हटलंय. कामगारांच्या सामाजिक सुरक्षा हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास कष्टकरी कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी संघटनेचे जिल्हा संघटक सुहास साळोखे, अमित पै, अमर ढेरे, श्रीकांत माजगांवकर, चंद्रकांत वडर, भूषण मेटके, तुकाराम साळोखे आणि बंटी साळोखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.




