कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील पिरळ परिसरातील नाळवा भागात भातपीक काढणीच्या तोंडावर आले आहेत. मात्र, गवारेड्याने शेतात धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे आधीच उत्पादनाची चिंता सतावत असताना वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीने जगणे नकोसे झाल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पावसाच्या प्रतिक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता शेतात उभे असलेले भातपीक वाचवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. वर्षभराचा उदरनिर्वाह आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्याची आशा ज्या भातपिकांवर अवलंबून आहे, तेच पीक काढणीपूर्वी नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकीकडे पाऊस दडी मारतोय, तर दुसरीकडे गवारेडा हातातोंडाचा घास हिरावून घेतोय, अशा दुहेरी संकटात बळीराजाने दाद मागायची तरी कुणाकडे ? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.




