ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचे निधन…पंतप्रधानांसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – ज्येष्ठ आणि अभ्यासू राजकीय पत्रकार पायल मेहता यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी त्यांचे वय ४६ वर्ष होते.
पायल मेहता काही कामानिमित्त मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. रविवारी पहाटे २ च्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. नंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबतची माहिती ट्विट करून ज्येष्ठ पत्रकार शीला भट्ट यांनी दिली.
पायल मेहता यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पायल मेहता या संसद, केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बीटवर गेली अनेक वर्षे अत्यंत सचोटीने काम करत होत्या. ग्राउंड रिपोर्टिंगवरील त्यांची पकड, क्लिष्ट राजकीय विषयांचे सखोल आकलन आणि बातमीतील वस्तुनिष्ठता यामुळे त्यांनी दिल्लीच्या पत्रकारिता क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

Scroll to Top