कोल्हापूर – करवीर तालुक्यातील मौजे कोगील खुर्द गावातील गायरान गट क्रमांक एक मध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु करण्यात आले आहे. हे वाचनालय अतिक्रणात असल्याचे ठरवत प्रशासनाने वाचनालय सील केले आहे. या वाचनालयात सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येत होते. परंतु प्रशासनाने वाचनालय सील केल्याने विद्यार्थांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे वाचनालयाचे सील तात्काळ काढण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
करवीरचे तहसीलदार स्वनिल पवार आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. ज्या जागेवर ग्रामसभेचा ठराव आहे, ग्रामपंचायतीने अधिकृत प्रस्ताव दिलाय आणि शासकीय पातळीवर मागणी प्रलंबित आहे, त्या जागेवरील सार्वजनिक वाचनालयावर थेट अतिक्रमणची कारवाई करणे योग्य आहे का ? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा ग्रामस्थ, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, अमित नागटिळे, प्रवीण बनसोडे, सचिन कांबळे, निलेश कांबळे, समीर घारे, रोशन कांबळे, निलेश बनसोडे, शिवराम बुध्याळकर, विनायक भोसले, मारुती कांबळे आदी उपस्थित होते.




