जालना – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी, मुंबई पोलिसांकडे उपोषण करण्यासाठी तिसऱ्यांदा परवानगी मागितली आहे.
परवानगी दिली नाही तरी मुंबईला जाण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. सुरुवातीला ५ हजार जणांच्या आंदोलनाला परवानगी मागितली होती. त्यानंतर एकटाच जाणार अशी घोषणा केली. आता जरांगे पाटील यांनी ५ ते ५० लोकांना आंदोलनाची परवानगी द्यावी, वाहतुकीला अडथळा होणार नाही असं म्हणत परवानगी मागणारं पत्र मुंबई पोलिसांना पाठवलं आहे.
यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना हमीपत्रही दिले आहे. त्यात म्हटलं की, १९ सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी आहे, त्यामुळे १८ सप्टेंबरला आंदोलनाची परवानगी द्यावी. आंदोलनात केवळ ५० लोकच सहभागी होतील. पोलीस ज्या अटी घालतील त्या आणि सर्व नियम आम्हाला मान्य असतील. दिलेल्या वेळेतच आंदोलन सुरू करू असंही त्यांनी म्हटलंय. मुंबई पोलिसांकडून पुन्हा आंदोलनाला परवानगी नाकरली गेली तर कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. यावर दुपारपर्यंत निर्णय होवू शकतो.




