पुणे – पुण्यात ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजारी होत्या त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
28 जुलै 1953 साली मधु कांबीकर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. तमाशानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.




