अभिनेत्री माधुरी दीक्षित सोनी मराठी वाहिनीवर दिसणार नव्या भूमिकेत…

मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वात सूत्रसंचालिका म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित दिसणार आहे. माधुरी दीक्षित यांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता त्या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत.

ज्ञानाची, जिद्दीची आणि स्वप्नांची परंपरा कायम असली तरी यंदा माधुरी दीक्षित यांच्या येण्यानं या मंचावर नवा दृष्टीकोन, नवी ऊर्जा आणि एक वेगळी उब अनुभवायला मिळणार आहे.
यावर माधुरी दीक्षित म्हणाल्या, ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबांच्या आशांचा, स्वप्नांचा आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव आहे. अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि त्याच्या स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार होण्याची संधी मला मिळते आहे याचा मला विशेष आनंद आहे.या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, असे त्या म्हणाल्या

Scroll to Top