कोल्हापूर : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘गोकुळ’ने दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला. कच्च्या मालाचे दर दुप्पट झाले, तरी पशुखाद्याचे दर वाढविण्यात आले नाहीत, असा किस्सा आमदार सतेज पाटील यांनी ठरावधारकांसमोर सांगितला.
पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सतेज पाटील यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेत परिस्थितीची माहिती दिली. भविष्यात कच्च्या मालाचे दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सुमारे ३० कोटी रुपयांचा कच्चा माल आगाऊ खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर कच्च्या मालाच्या दरात तब्बल दुप्पट वाढ झाली. मात्र, ‘गोकुळ’ने पशुखाद्याच्या दरात वाढ केली नाही. त्यामुळे पशुपालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला नाही आणि त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला. बाजारातील संभाव्य दरवाढीचा अंदाज घेऊन वेळीच निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देता आला. दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय आणि संचालक मंडळातील एकमत यामुळे दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेऊन ते तडीस नेता येतात, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
गोकुळमध्ये एकहाती सत्ता असल्यामुळे एकमुखी निर्णय घेणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होते, हे पटवून देताना त्यांनी पशुखाद्य दराचा हा अनुभव ठरावधारकांसमोर मांडला. दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
एकहाती सत्ता ही केवळ सत्तेसाठी नसून दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची आहे, असा संदेश देत आमदार सतेज पाटील यांनी ठरावधारकांना या निर्णयाचा संदर्भ दिला.




