मुंबई – गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी सुरु असलेल्या घडामोडीवर बोलताना खा. संजय राऊत यांनी, गोकूळची सत्ता हातून गेल्याने सत्ताधारी अस्वस्थ झाल्याचा हल्लाबोल केला आहे.
खा. संजय राऊत म्हणाले की, आ. सतेज पाटील यांच्या पारड्यात शेतकऱ्यांनी आपलं बळ दिलं आहे. असं असताना लोकशाहीचा कौल झुगारून गोकूळवर चार संचालक नेमण्याचा घाट घातला जात आहे. गोकूळ बळकावण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्रातील लोकशाही ही महायुती सरकारमुळेच धोक्यात आली आहे. सत्ताधारीच लोकशाहीचे हत्यारे आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे गोकूळची निवडणूक आहे. आ.सतेज पाटील यांच्या पॅनलने 25 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. सतेज पाटील यांना बहुमत मिळालं आहे. त्यामुळे त्यांचाच अध्यक्ष झाला पाहिजे. साडेपाच लाख दूध उत्पादकांनी त्यांना मतदान केलं आहे. त्यांना निवडून दिलं आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटलांसारखे लोकशाहीचे विरोधक बहुमताचा अनादर करून अध्यक्ष निवडू देत नाहीत , अशी टीका त्यांनी केली आहे.
आता फडणवीस सरकार खास गोकूळसाठी नवीन कायदा आणत आहे. गोकूळमध्ये चार एक्सपर्ट संचालक घुसवून स्वत:चं बहुमत करून गोकूळ संघ ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा आहे. अमित शाह सहकार मंत्रालयाचे प्रमुख आहेत. त्यांनी सहकार मंत्रालय या चोऱ्यामाऱ्यांसाठी घेतलं आहे. महाराष्ट्राच्या किंवा इतर राज्यातील सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गोकूळ हे अमूलला विकण्याचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला आहे . आ. सतेज पाटलांचे 13 संचालक निवडून आले. विरोधकांनी दोन संचालक चोरले , नाही तर बहुमत 15 चं असतं, असंही ते म्हणाले .




