मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणात तब्बल ५८९ दिवसांनंतर महत्त्वाची घडामोड समोर आली. या प्रकरणातील आरोपी शरीफुल इस्लाम शेख याने आपण केलेला गुन्हा कबूल करण्याची इच्छा व्यक्त केलीय. आरोपीने न्यायालयात अर्ज दाखल करून आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असल्याचे नमूद केले असून, गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवलीय.
१६ जानेवारी २०२५ रोजी सैफ अली खान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. आरोपी शरीफुल इस्लाम शेख हा तैमूरच्या खोलीजवळील बाथरूममधून घरात शिरल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाले होते. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी शरीफुल शेख याला अटक केली. त्यानंतर तो न्यायालयीन प्रक्रियेला सामोरा जात आहे. आता या प्रकरणात आरोपीने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जामुळे नवा ट्विस्ट आलाय. आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असून गुन्हा कबूल करण्यास तयार असल्याचे शेख याने अर्जात म्हटले आहे. तसेच, या प्रकरणात आपल्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंतीही त्याने न्यायालयाकडे केली आहे. आरोपीच्या या अर्जामुळे प्रकरणाच्या पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.




