कोल्हापूर : काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरल्याने कोल्हापूर शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतील तिन्ही उपसा पंप कार्यान्वित करण्यात आल्याने आज, गुरुवारपासून शहरात दररोज पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाणार आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे.
सध्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची गढूळता वाढली आहे. नदीपात्रातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार क्लोरिन व अॅलमचे योग्य प्रमाणात डोस देऊन पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे.
तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. तसेच दररोज नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतरही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.




