गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते नामदार हसन मुश्रीफ आणि भाजप नेते नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आजरा, गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान राष्ट्रवादीच्या ठरावाची भाजपकडून क्रॉसपडताळणी का केली जाते? अशी विचारणा करत गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आक्रमक भूमिका घेतली या वरून बैठकीत वादावादी झाल्याने अखेर सर्व नेते इथून पुन्हा बैठक घेण्यासाठी थेट दुसऱ्या ठिकाणी निघून गेले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकी संदर्भात आज नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात भाजप नेते नामदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी आजरा गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यावेळी भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तालुकानिहाय कोणाकडे किती ठराव आहेत? याची माहिती घेतली जात होती. दरम्यान यावेळी गडहिंगलज मधील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित असताना भाजपचे काही कारभारी मंडळी राष्ट्रवादीच्या ठरावांच्या बेरजेची पडताळणी का करत आहेत असा सवाल उपस्थित केल्याने या बैठकीत काही काळ गोंधळ उडाला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या बैठकीतच पदाधिकाऱ्यां मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
दरम्यान भाजप राष्ट्रवादीच्या बैठकीत वादावादी झाल्याचे समजताच माध्यमांचे प्रतिनिधी भाजप कार्यालयात पोहचले.मात्र काही झालेलेच नाही अशा अविर्भावात नामदार हसन मुश्रीफ,नाम. चंद्रकांत पाटील आणि प्रमुख नेतेमंडळी यांनी बैठक गुंडाळूनभाजप कार्यालयातून थेट काढतापाय घेत बैठकीसाठी अन्यत्र जाणे पसंत केले. बाहेर पडताना भाजप नेते नामदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून भाजप खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक एकत्र गेले तर आमदार हसन मुश्रीफ हे आपल्या वाहनातून एकटे बाहेर पडले.एकंदरीत या बैठकीत झालेल्या वादातून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी मधील मतभेद समोर आले आहेत.
बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक,माजी आमदार संजय बाबा घाटगे, गोकुळचे माजी संचालक डॉ.चेतन नरके आदी उपस्थित होते.




