खाकी वर्दीतल्या कोल्हापूरच्या लेकींनी ठरवलं आणि करून दाखवलं…

कोल्हापूर – शहरात काल शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षीची विसर्जन मिरवणूक कशी पार पडणार? याबद्दल मिरवणुकीपूर्वी अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की या कोल्हापूरच्या दोघी लेकींनी मिरवणुकीची जबाबदारी घेतली आणि ती पार देखील पाडली.

गणेशोत्सव निमित्त गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये. यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. गेल्या दीड महिन्यापासून कोल्हापूर शहरातील दोन स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप – प्रत्यारोपामुळे संपूर्ण शहरातील वातावरण तणावपूर्ण होत. या वादाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडणे हे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. मात्र पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरुवातीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी नियम अटी घालून दिल्या होत्या. प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा थेट पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिला होता.

यावर्षी कोल्हापूर शहरात विसर्जन मिरवणुकी दरम्यान जवळपास पंधराशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की आणि शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील या कोल्हापूरच्या लेकींवर मुख्य मिरवणूक मार्गाच्या बंदोबस्ताची जबाबदारी होती. सुवर्णा पत्की या मिरवणूक संपेपर्यंत मिरजकर तिकटी येथे तळ ठोकून होत्या, तर शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील या बिनखांबी गणेश मंदिर इथून संपूर्ण मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवून होत्या.

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कोल्हापूर शहरात प्रथमच यावर्षी मिरवणुकीसाठी टायमर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यामुळे मिरवणूक रेंगाळली नाही. कोल्हापूरच्या लेकी असणाऱ्या दोन
खाकी वर्दीतल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलं आणि ते करून दाखवलं असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. कोल्हापूरच्या माहेरवाशीणी असणाऱ्या पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि
सुवर्णा पत्की यांनी मिरवणुकीची जबाबदारी स्वीकारली आणि सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयातून आणि शहरवासीयांच्या सहकार्यातून मिरवणूक शांततेत पार पडली. या दोघींना कोल्हापूरची माहेरवाशीण असणाऱ्या आणि पोलीस मुख्यालयात अर्ज शाखेच्या प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा पाटील आणि सांगलीची माहेरवाशीण असणाऱ्या आणि पोलीस मुख्यालयात महिला सेलच्या प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव या दोघींनीही आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. यामुळे कोल्हापूरची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली.

Scroll to Top