१५८ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई
कोल्हापूर – आज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या विशेष शिबिरात मोका प्रकरणातील आरोपी, हद्दपारीची मुदत संपलेले आरोपी, चालू गुन्ह्यांतील आरोपी, आर्म्स अॅक्टसह इतर विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवर असलेले आरोपी आणि वॉरंट असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सार्वजनिक शांतता आणि कायदा, सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी ही कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील आरोपींनी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊ नये, यासाठी त्यांना पोलिसांकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या कारवाईमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५० आरोपी, इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३५, शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३४, कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २० आणि हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९ आरोपींचा समावेश आहे.




