राधानगरी पर्यटनासाठी शनिवार, रविवारी विशेष बससेवा…

पर्यटकांना एकाच वेळी ‘ही’ चार ठिकाणे पाहता येणार

कोल्हापूर – राधानगरी तालुका म्हणजे निसर्गसौंदर्याची खाणच… पावसाळ्यात तर या परिसराचे रूप अधिकच खुलते. डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, धुक्याची चादर पांघरलेली हिरवीगार वनराई आणि जलाशयांचे विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. मात्र, विविध पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र वाहनांची आवश्यकता भासत असल्याने अनेक पर्यटकांना अडचणी येत होत्या. हीच अडचण लक्षात घेऊन एसटीच्या राधानगरी आगाराने ‘राधानगरी पर्यटन’ ही विशेष बससेवा सुरु केली आहे.

 राधानगरीच्या पर्यटनाला नवी दिशा देण्यासोबतच स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, पर्यटकांची संख्या वाढावी आणि ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत, हा या उपक्रमा मागील उद्देश आहे. शनिवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता कोल्हापूरहून विशेष बस रवाना होणार आहे. या पर्यटन फेरीत आदमापूर, काळम्मावाडी धरण, राधानगरी धरण आणि प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा या स्थळांना भेट देता येणार आहे. दिवसभर राधानगरीच्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर सायंकाळी ४ वाजता बस राधानगरीहून कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. त्यामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि पर्यटकांना एकाच दिवसात राधानगरीच्या विविध पर्यटनस्थळांची सफर करण्याची संधी मिळणार आहे. राधानगरीच्या निसर्गरम्य पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख प्रवीण पाटील यांनी केले आहे. एकाच दिवसात देवदर्शनासह निसर्ग पर्यटनाचा आनंद देणारी ही पर्यटन बससेवा राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Scroll to Top