एआय संशोधनात कोल्हापूरच्या लेकीची जागतिक झेप; डॉ. वैभवी चव्हाण यांना मानद डॉक्टरेट
कोल्हापूर - कसबा बावड्याची कन्या आणि यूकेमधील रेव्हन्सबोर्न युनिव्हर्सिटी लंडनमध्ये वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वैभवी विजय चव्हाण यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे. बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर केलेल्या उल्लेखनीय संशोधनासाठी त्यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ एडुस्कोप - प्रोफेशनल अँड सोशल रिसर्चतर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल क्लायमेट सस्टेनेबिलिटी लीडरशिप समिटमध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे तसेच दिल्ली सरकारमधील मंत्री सरदार मनजिंदर सिंग सिरसा यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.
डॉ. चव्हाण यांनी यूकेमधील बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना 'मानव आणि एआय यांच्यातील सहयोग' या विषयावर सखोल संशोधन केले आहे. एआय-सक्षम प्रकल्प व्यवस्थापनामधील विश्वास, निर्णयक्षमता, सहयोग, प्रशासन आणि मानवी देखरेख यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंवर त्यांनी अभ्यास केला आहे. प्रकल्प आधारित संस्थांमध्ये जबाबदारीने एआयचा वापर कसा करावा याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक कामगिरीची, आंतरराष्ट्रीय संशोधनातील प्रभावाची आणि प्रकल्प व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे डॉ. वैभवी चव्हाण यांना यापूर्वीही अनेक जागतिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. PMI Future 50 Honoree 2024, IPMA GeCCo Global eCollaboration Competition Top-3 Winner 2025, PMXPO PM Passport Top Winner 2025, Distinguished Indian Women Achiever Award 2026 आणि Most Promising Researcher Award 2026 यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. वैभवी चव्हाण यांनी हा गौरव आपल्या आई-वडिलांना समर्पित केला. वडील ॲड. विजय शामराव चव्हाण आणि आई विभावरी चव्हाण यांचा विश्वास, मार्गदर्शन आणि पाठिंबा हेच आपल्या यशाचे खरे बळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनातून जागतिक स्तरावर आपली छाप पाडणाऱ्या डॉ. वैभवी चव्हाण यांच्या या यशामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.