ऊस वाहतुकदारांच्या कागदपत्रांचा वापर करून मुकादम आणि कारखान्यांनी घेतलं कर्ज...
कोल्हापूर - गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस वाहतूकदारांकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी करार केले जातात. यासाठी कारखाना प्रशासन ऊस वाहतुकदारांकडून आवश्यक कागदपत्र जमा करून घेते. राज्यातील सुमारे दीडशे खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी मुद्रा कर्ज योजनेची उचल केली आहे, या प्रकरणात अनेक नामवंत बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासन आणि वाहतूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेने केला आहे.
या प्रकरणी साखर कारखान्यांचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक, शेती अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबत कार्यवाही झाली नाही तर यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
राजगोंडा पाटील यांनी, या आंदोलनाच्या माध्यमातून करारावेळी ऊस वाहतुकदारांचे कोरे धनादेश आणि कोऱ्या कागदावर किंवा कोऱ्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्या घेवू नयेत, मुकादमावरील फसवणुकीचे गुन्हे जलद गती न्यायालयात चालवावेत, ऊस वाहतुकदारांची मुकादमांकडून झालेल्या फसवणुकीची जबाबदारी सर्व साखर कारखानदारांनी घ्यावी, आदि मागण्यांकडे लक्ष वेधले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष सागर निकम, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रवीण पाटील, संजय गायकवाड विजय परीट आदि उपस्थित होते.