मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू; फेरीवाल्यांचा तीव्र विरोध
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून कारवाईला फेरीवाल्यांकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करत असताना अनेक फेरीवाले आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. खोकी आणि इतर साहित्य जप्त करण्याच्या प्रक्रियेला काही फेरीवाल्यांनी विरोध दर्शविला आहे.
कारवाई रोखण्यासाठी काही फेरीवाले थेट रस्त्यावर झोपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आणि फेरीवाले यांच्यात शाब्दिक वादही सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.