आंदोलन

शिवाजी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय काम बंद आंदोलन

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – राज्यातील विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने मागील तीन वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. आतापर्यंत धडक मोर्चा, धरणे आंदोलन, लेखणी बंद आंदोलन या माध्यमातून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने या आंदोलनातील पुढील टप्पा म्हणून आज एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात ठिय्या मारत कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

सातव्या वेतन आयोगानुसार १०: २० : ३० वर्षांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत. गोंडवाना विद्यापीठासाठी स्वतंत्र सहसंचालक कार्यालय स्थापन करावे, विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करावे. अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात मुख्य संघटक मिलिंद भोसले, आनंदराव खामकर, दिनेश उथळ, शरद तळेकर, राजेंद्र खामकर, कमलाकर जाधव, डॉ. सुनीता वांगीकर, शीतल आडनाईक, सुरेखा आडके यांनी सहभाग घेतला.

संबंधित विषय

Scroll to Top