कोल्हापूर – जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत, राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ संग्रहालय तसेच दुर्मिळ स्टॅम्प पेपर संग्राहक राजकुमार बापूसो खुरपे, जयसिंगपूर व अन्सार रमजान पटेल, कुरूंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील विविध राज संस्थानांतील दुर्मिळ स्टॅम्प पेपरचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यामुळे कोल्हापूरकरांना ऐतिहासिक स्टॅम्प पेपरची पर्वणी पहायला मिळणार आहे.
उद्या २४ ते २६ नोहेंबर या कालावधीत कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळातील अस्थायी दालनामध्ये हे प्रदर्शन पाहता येणार आहे. पर्यटक, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी आणि शाहूप्रेमी जनतेने या प्रदर्शनास भेट देवून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे यांनी केले आहे.




