मुंबई – आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण झाली आहे. बीईएसईवरील सुचिबद्ध कंपन्यांचे एकूण शेअर बाजार भांडवल ५१४.१८ लाख कोटी रुपये होते. पण नंतर झालेल्या घसरणीमुळे ते ५१०.८१ लाख कोटी रुपयांवर आले आहे. परिणामी गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
सकाळी सेन्सेक्स आपल्या दिवसातील उच्चांकी पातळी असलेल्या ८४,६६२ अंशांवरून १,४०० अंशांहून अधिक घसरून ८३,२१० या नीचांकी पातळीवर आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ०.७ टक्क्यांनी म्हणजेच १८० अंशांहून अधिक घसरून २५,६०० च्या खाली आला.
सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. दुसरीकडे, टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि मारुती सुझुकी हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.




