मुंबई – बिस्लेरी पाणी म्हणजे शुध्द पाणी असं समीकरण असल्याने सर्वजण बिस्लेरी पाण्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देतात. परंतु या बिस्लेरी पाण्याबाबत आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या पाण्यात कर्करोगाला कारणीभूत ठरणारे काही घटक असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय खाद्य आणि सुरक्षा मानक प्राधिकरणने बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.
बिस्लेरी कंपनीच्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासणीत असुरक्षित आढळला होता. पाण्यात ब्रोमेट या संभाव्य कर्करोगकारक घटकाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले होते. कंपनीच्या अपीलनंतर नमुना रेफरल फूड लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. रेफरल लॅबच्या तपासणीत पाण्यात पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळले. दोन्ही तपासण्यांत पाणी असुरक्षित ठरल्याने अन्न सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.




