इतर

शिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करा : अपर जिल्हाधिकारी अजय पवार

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी काढावीत. तसेच सर्वाधिक अपघातग्रस्त असणाऱ्या शिरोली-किणी मार्गावरील अपघाताचे ऑडिट करण्यात यावे, अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी व्यक्त केली आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
अपर जिल्हाधिकारी अजय पवार म्हणाले की, रस्ते अपघातामुळे अनेकांवर मृत्यू ओढावू शकतो. याचे प्रमाण कमी करणे संपूर्णता मानवी हातात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक या कामाला प्राधान्य द्यावे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच केंद्र सरकारच्या सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या सहकार्याने देशभरातील शंभर जिल्ह्यामध्ये ‘झिरो फॅटलिटी डिस्ट्रीक’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे.
या जिल्ह्यातून राष्ट्रीय,राज्य आणि प्रमुख महामार्ग जातात. पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात 52 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चिती करण्यात आली आहे. ही सर्व ब्लॅक स्पॉट लवकरात लवकर दुरुस्त करावीत. जिल्ह्यातील सर्व महामार्गावरील खड्डे भरणे, रोड मार्किंग करणे, डिव्हायडर संदर्भात फलक लावणे, सिग्नल दुरुस्ती, चौकात पट्टे मारणे, झाडांच्या फांद्या कट करणे, राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अतिक्रमणे काढणे. त्याचबरोबर रोड लगतच्या साइड पट्टया भरुन घेणे आदी कामे संबंधित विभागाने वेळेत करावीत, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले आहे.

राहवीर योजनेची माहिती सर्व पोलीस स्टेशनमध्ये दर्शनी भागात लावावी. तसेच या योजनेला व्यापक प्रसिध्दी मिळावी, अशी सूचना अशासकीय सदस्य विनायक रेवणकर यांनी या बैठकीत केली.
नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता महेश पाटोळे, पीडब्ल्यूडीचे क्रांतीकुमार मिरजकर, कार्य.अभियंता डी. आर. भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, इचलकरंजी आरटीओ श्रीकृष्ण नकाते, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top