इचलकरंजी – शहरातील गुजरी पेठ येथील राहणारे ३५ वर्षीय ज्योतिषी मंदार अजित रानडे यांच्या हत्येने संपूर्ण इचलकरंजी शहर हादरले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मानकापूर गावच्या शिवारात मंदार रानडे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने गळ्यावर वार करण्यात आले होते.
या खून प्रकरणी सदलगा पोलिसांनी शिरढोण परिसरातून एकाला अटक केली आहे. संशयित बाबासो उर्फ दीपक अण्णा मगदूम याच्या मुलीने १३ जानेवारी २०२६ रोजी घरातून निघून महाराष्ट्रातील शिवनायकवाडी येथील ओंकार आनंद कोंचे याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. हा विवाह ज्योतिषी मंदार रानडे यांनी जुळवून देण्यास मदत केल्याचा राग मगदूमच्या मनात होता. याच रागातून त्याने रानडे यांना संपवण्याचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मगदूम वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून रानडे यांना संपर्क साधला. आणखी एक लग्न जुळवायचे असल्याचे सांगत त्याने रानडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना इचलकरंजी येथून माणकापूर गावच्या शिवारात बोलावून घेतले. याठिकाणी मगदूम याने त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. त्यानंतर सोबत आणलेल्या धारदार विळ्याने त्यांच्या गळ्यावर सपासप वार केले. या घटनेनंतर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नातेवाईक, मित्रमंडळींची चौकशी, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. चौकशीदरम्यान संशयिताने हत्येची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. याबाबत सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



