कोल्हापूर – विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख यांनी कागल तालुक्यात आभार दौरा केला. या दौऱ्यानिमित्त महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्यावतीने कागल तालुक्यातील मेतके येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अनिल घाटगे, काँग्रेसचे कागल तालुकाध्यक्ष डॉ. दयानंद पाटील-नंद्याळकर यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी बोलताना नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख यांनी राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी असलेल्या कागलमधील स्वाभिमानी पदवीधर मतदारांनी आर्थिक आमिषाला बळी न पडता मला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सांगितले. आमदार सतेज पाटील यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे हा विजय शक्य झाल्याचे सांगून, पदवीधरांचे प्रश्न, युवक-युवतींचे प्रश्न आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सद्गुरू बाळूमामा सत्यवादेवी ट्रस्टच्यावतीने आमदार हर्षदा देशमुख यांचा साडी-चोळी देऊन, तर प्रभाकर देशमुख यांचा घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठल पाटील, तानाजी गायकवाड, मलगोंडा पाटील, रोशन पाटील, हेमलता विठ्ठल पाटील, शिवाजी मेथे आणि कमल भामरे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमर चौगुले, सुशांत पाटील, राजू शिंदे, अक्षय पाटील, कॉम्रेड आनंदा डाफळे, कॉम्रेड श्रीकांत चव्हाण, प्रकाश पार्ट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश सावंत, लक्ष्मण माळी, महादेव कामते यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




