कोल्हापूर – ‘हेल्मेट वापरा आणि सुरक्षित जीवनाचा संकल्प करा,’ असा संदेश देत प्रादेशिक परिवहन विभाग नागरिकांना वेळोवेळी जागृत करण्याचे काम करते. परंतु अपघाताची झळ सोसल्यानंतरच वाहनधारकांना हेल्मेटची किंमत समजते असे आता म्हणावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट न वापरल्याने तब्बल तीन वर्षांत १६७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या गोष्टींचा विचार करून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दुचाकी अपघातात डोक्याला होणारी गंभीर दुखापत आणि जीवितहानी टाळण्यासाठी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीनेही निर्धारित मानकांचे हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
यासाठी दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.




