कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या सन २०२६-३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत म्हणजेच सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकूण ५ हजार ४१८ मतदारांपैकी ५३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४३६ पुरुष आणि १०१ महिला मतदारांचा समावेश असून, एकूण मतदानाची टक्केवारी ९.९१ इतकी झाली आहे.
पहिल्या दोन तासांच्या मतदानात कागल तालुक्याने सर्वाधिक २८.२७ टक्के मतदानाची नोंद करत आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल शाहूवाडी तालुक्यात १६.५९ टक्के, शिरोळमध्ये १५.५६ टक्के आणि हातकणंगले तालुक्यात १२.४२ टक्के मतदान झाले आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार कागल तालुक्यात ६१९ मतदारांपैकी १७५ जणांनी मतदान केले. करवीर तालुक्यात ८६५ मतदारांपैकी ७५ जणांनी, तर शाहूवाडी तालुक्यात ४४० मतदारांपैकी ७३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिरोळ तालुक्यात २७० मतदारांपैकी ४२ जणांनी, राधानगरीत ६९९ पैकी ४१ जणांनी आणि गडहिंग्लजमध्ये ३९९ पैकी २४ जणांनी मतदान केले. भुदरगड तालुक्यात ५९३ मतदारांपैकी २३ जणांनी मतदान केले असून, येथे सर्वात कमी ३.८८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी…
- कागल : १७५ मतदान (२८.२७ टक्के)
- शाहूवाडी : ७३ मतदान (१६.५९ टक्के)
- शिरोळ : ४२ मतदान (१५.५६ टक्के)
- हातकणंगले : २० मतदान (१२.४२ टक्के)
- करवीर : ७५ मतदान (८.६७ टक्के)
- गडहिंग्लज : २४ मतदान (६.०२ टक्के)
- राधानगरी : ४१ मतदान (५.८७ टक्के)
- गगनबावडा : ७ मतदान (५.३४ टक्के)
- आजरा : १६ मतदान (५.२५ टक्के)
- चंदगड : १९ मतदान (४.४९ टक्के)
- पन्हाळा : २२ मतदान (४.२९ टक्के)
- भुदरगड : २३ मतदान (३.८८ टक्के)
गोकुळच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. पहिल्या दोन तासांत एकूण ९.९१ टक्के मतदान झाले असून, पुढील टप्प्यांत मतदानाचा वेग किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोकुळच्या आगामी पाच वर्षांच्या कारभाराची दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीत सभासद कोणाला कौल देतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्या, १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.




