कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठरावधारकांना शपथ देण्याच्या प्रकारावरून जोरदार वाद सुरु असतानाच आजही पुन्हा एकदा आदमापूरमध्ये ठरावधारकांच्या शपथा घेण्याचा प्रकार आढळून आला आहे. छत्रपती शाहू शेतकरी आघाडीच्यावतीने आज, सकाळी आदमापूरात ठरावधारकांना ब्रेनस्ट्रोकची भीती घालत त्यांच्या शपथा घेण्यात आल्या .यामध्ये महायुतीच्या मोठ्या नेत्यांचा सहभाग होता . शपथ मोडली तर ब्रेन स्ट्रोक येतो अशी भीती के पी पाटलांकडून ठरावधारकांना घालण्यात आली. दोन दिवसांपूर्वी सौंदती इथं शपथ घेण्याच्या प्रकाराला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जोरदार विरोध दर्शवला होता.असं असतानाही आज पुन्हा आदमापुर येथे शपथा घेत महायुतीकडून ग्रामीण भागात अंधश्रद्धा पसरविण्याचा हा प्रकार करण्यात आला..
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून ठरावधारकांना कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात शपथ दिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. या प्रकारावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही शपथ देण्याच्या प्रकारावर प्रश्न उपस्थित करत ठरावधारकांवर अविश्वास दाखवल्याबद्दल टीका केली होती.
त्यानंतर आज महायुतीकडून आदमापूर इथं शपथा घेण्यात आल्यानं हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना शपथांच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. निवडणुकीसारख्या लोकशाही प्रक्रियेत मतदारांवर अविश्वास दाखवत शपथा घेण्याच्या या प्रकाराबद्दल मतदारांकडून तसंच नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.




