आमदार सतेज पाटील यांच्या भेटीगाठींना राधानगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी राधानगरी तालुक्यातील ठरावधारकांच्या भेटीगाठी घेतल्या. कुडूत्री, सोन्याची शिरोली आणि राधानगरी येथे झालेल्या भेटीगाठींना मोठी उपस्थिती लाभली. त्यामुळे या संवाद दौऱ्याचे रूपांतर सभांमध्ये झाले.

कुडूत्री येथील सभेत बोलताना आ. सतेज पाटील यांनी, गोकुळच्या सत्तेत असताना दूध उत्पादकांना जादा दर देण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले. म्हशीच्या दुधाला १४ रुपये आणि गायीच्या दुधाला १० रुपये अधिक दर देण्याचे काम केले. कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेत ऊस आणि दूध व्यवसायाचा मोठा वाटा असून गोकुळशी साडेपाच लाख दूध उत्पादक जोडले आहेत. दूध उत्पादन वाढीसाठी पशुधन सुधारणा, भाकड काळ कमी करण्यासाठी प्रयत्न, नवीन जनावरे खरेदीसाठी मार्गदर्शन तसेच हरियाणा आणि पंजाबमधून जातीवंत जनावरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र उभारण्याची भूमिका त्यांनी मांडली. म्हैस खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान, नवीन इमारतींसाठी वाढीव अनुदान आणि जुन्या इमारती दुरुस्तीसाठी अनुदान देण्याबाबत त्यांनी आश्वासनात्मक भूमिका मांडली.

दूध उत्पादकांच्या हितासाठी एकमुखी सत्ता आवश्यक आहे. गोकुळच्या विरोधी पॅनेलचा निर्णय मुंबईत होत असेल तर सर्वसामान्यांच्या विकासाचे निर्णयही मुंबईतूनच होणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. दूध उत्पादक शेतकरी संजय डवर यांनी, सतेज पाटील यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून नेतृत्व केले असल्याचे सांगितले. गोकुळच्या मल्टिस्टेटचा घाट त्यांनी उधळून लावल्याने, हा संघ शेणात राबणाऱ्या दूध उत्पादकांच्या मालकीचा राहिला आहे. दूध उत्पादकांच्या हितासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्या नेतृत्वाच्या पॅनेलला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सभापती अश्विनी चौगले, हिंदुराव चौगले, सदाशिवराव चरापले, अभिजित तायशेटे, विश्वनाथ पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, रणधीर मोरे, एकनाथ पाटील, मधुकर रामाणे, रमेश बचाटे, बाजीराव चौगले, राहुल देसाई, मोहन धुंदरे, चंद्रकांत चौगले, संजय माळकर, बेबी डवर, भारती चौगले यांच्यासह दूध उत्पादक आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top