नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सावळ्या गोंधळामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जोर वाढू लागला आहे. यावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी, ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर त्यांच्याविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होईल आणि अखेर त्यांना पदावरून पायउतार व्हावेच लागेल, असे वक्तव्य केले आहे.
पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, “ज्ञानेश कुमार यांना कधी ना कधी राजीनामा द्यावाच लागेल, यात अजिबात शंका नाही. त्यामुळे लवकरात लवकर स्वतःहून राजीनामा देणेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल. जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर हे आंदोलन थांबणार नाही. इंडिया’ आघाडीसह इतर अनेक सामाजिक आणि राजकीय गट याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यामुळे अखेर त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईलच.




