काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन…

काँग्रेसचा अभ्यासू, संयमी आणि निष्ठावंत नेता हरपला

पुणे – आज सकाळी पुण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. ८० व्या वर्षी राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचा अभ्यासू, संयमी आणि निष्ठावंत नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

रत्नाकर महाजन हे राज्य नियोजन महामंडळाचे माजी कार्याध्यक्ष होते. त्यांनी लोकप्रबोधनी संस्थेचे अध्यक्षपदही भुषविले होते. समाजवादी विचारवंत , राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसशी शेवटपर्यंत इमान राखणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. रत्नाकर महाजन हे डॉक्टर होते. त्यांनी आणीबाणीच्या काळात सक्रियपणे काम केले. त्यांना त्यावेळी तुरूंगवासही सहन करावा लागला होता. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान आदी पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा पगड त्यांच्यावर होता. समाजवादासोबतच त्यांनी आगरकर आणि महात्मा गांधी यांचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणले होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि पदे भुषविली आहेत. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसची पिछेहाट होत असताना पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी त्यांनी योग्यपणे पार पाडली.

Scroll to Top