कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील एमडी ड्रग्जनिर्मिती कारखान्यावर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने छापा टाकून १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी एमडी ड्रग्स निर्मिती कारखान्याचे कनेक्शन दाऊद गँगपर्यंत गेल्याचे वाचण्यात आले, ही फार गंभीर बाब असून कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाचे हे मोठे अपयश आहे. चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि त्यांचे सहकारी नेमके काय काम करतात हे तपासण्याची वेळ आली आहे, अशा आशयाचे पत्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, त्याचबरोबर त्या विभागाचे डीवायएसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे.
आपल्या भारत देशाला पाकिस्तानातील अतिरेकी कारवायांचे अनेक वाईट अनुभव आलेले आहेत. विविध मार्गाने भारतीयांना टार्गेट केले जात आहे. पुलवामा, पहलगाम हल्ला तसेच अनेक वेळा गोळीबार, बॉम्बस्फोटाच्या घटना सुद्धा देशाने अनुभवले आहे. आपला देश अस्थिर करण्याच्या उद्देशाने लव्ह जिहाद, ड्रग्ज पुरवठा व इतर अमली पदार्थ भारतामध्ये पसरवून तरुण पिढी बर्बाद करण्याच्या उद्देशाने हे सर्व प्रकार सुरू आहेत, हा एक प्रकारचा जिहादच आहे. सध्या सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे टार्गेट केले असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस प्रशासनाने या सर्व घातक कारवाया मोडून काढण्यासाठी सक्षमपणे काम करणे गरजेचे आहे. चंदगड तालुक्यामध्ये ड्रग्ज बरोबर दारू तस्करी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असून संबंधित पोलीस याकडे दुर्लक्ष का करतात हे तपासण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.




