कोल्हापूर – सध्या साखर दरवाढीचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे कारखान्यांनी उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब द्यावा. तसेच मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसासाठी प्रतिटन पाचशे पंचवीस रुपयांप्रमाणे दुसरा हफ्ता देण्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांनी आदेश काढावेत. या मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनांच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांना देण्यात आले. १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा हफ्ता मिळाला नाही तर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करु, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील, शेतकरी सेना महाराष्ट्रचे सचिव जनार्दन पाटील, किसान मोर्चाचे सचिव भगवान काटे, आपचे संदीप देसाई, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, पदवीधर मित्र संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील, शेकापचे बाबासाहेब देवकर, आझाद हिंद क्रांती संघटनेचे अध्यक्ष मुकुंद पाटील, संभाजीराव चौगुले, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.




