कोल्हापूर – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्हा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्याचा ४७ हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी, शासनाच्या विविध महामंडळांनी तालुका निहाय शिबिरांचे आयोजन करुन शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. तसेच विविध योजनांतर्गत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावेत. अर्जासोबत जोडण्यात येणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित अर्जदारांना देऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, अशा सूचना केल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती शेतकऱ्यांना देवून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी अशी सूचनाही त्यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे सन २०२६-२७ चे उद्दिष्ट ४७ हजार कोटींचे आहे. जिल्ह्यात जून अखेर २० हजार ७१ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले असून वार्षिक उद्दिष्टाच्या ४३ टक्के उद्दिष्ट पूर्तता झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार यांनी या बैठकीत दिली.
बैठकीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी अधिकारी अभिनव खरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार, बँक ऑफ इंडियाचे उपअंचलिक प्रबंधक विशाल सिंग, नाबार्डचे व्यवस्थापक रोहन मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, केडीसीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




