मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ई चलन रद्द करण्यासाठी सुरु असलेले उपोषण स्थगित

कोल्हापूर – परिवहन विभागाकडून द्रुतगती महामार्गावर नियमापेक्षा वेग वाढल्यास आराम बसवर ई चलनाद्वारे हजारोंचा दंड आकारला जात होता. ही अन्यायकारक ई चलन पद्धत तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.

आज तेराव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी  त्यांच्या मागण्यांची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर राठोड यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहचवला. हा विषय राज्य आणि केंद्राचा असल्याने यावर केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर सात ते अकरा सप्टेंबर दरम्यान मुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची बैठक आयोजित करू, असे आश्वासन देण्यात आले आहे.

Scroll to Top