डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने कोल्हापूर महापालिकेला १ हजार ५५० पथदिवे प्रदान

कोल्हापूर –  कोल्हापूर शहराचे सौंदर्याकरण व्हावे, उर्जा बचत आणि शहरातील पथदिव्यांची समस्या लक्षात घेऊन डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने महापालिकेला आज १ हजार ५५० पथदिवे सुपूर्द केले. महापालिकेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे चौकात आयोजित कार्यक्रमात आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे हे पथदिवे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, शहरातील सर्व २१ प्रभागांमध्ये गरजेनुसार या पथदिव्यांचे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींसह पक्षाच्या सर्व ८१ उमेदवारांवर जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगितले. पथदिव्यांसाठी कोणत्या भागात किती वॅटचे दिवे आवश्यक आहेत, याचा अभ्यास करून नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका ही कोल्हापूर शहराचा आत्मा आहे. त्यामुळे सत्ता कोणाची आहे, यापेक्षा शहराचा विकास महत्त्वाचा आहे, असे सांगत आ. सतेज पाटील यांनी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तीला कोल्हापूरच्या सुविधा आणि शहराचे नियोजन पाहून चांगली भावना घेऊन जाता आले पाहिजे. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून शहराला चांगला चेहरा देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागत असला तरी वाहतूक नियोजन आणि पार्किंग ही कोल्हापूरसमोरील मोठी आव्हाने आहेत. वाहतुकीचा रिअल-टाइम डेटा, ट्रॅफिक कंजेशन आणि नेमक्या कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, याचा अभ्यास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येऊ शकतो. त्यातून एखाद्या ठिकाणी उड्डाण पूल आवश्यक आहे का ?, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे का, याचाही अभ्यास करायला हवा. कोल्हापुरातील शासकीय पॉलिटेक्निक, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज यासारख्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्थेवर प्रकल्प देऊन नवीन उपाययोजना शोधण्याची सूचना आयुक्त भारुड यांना आमदार पाटील यांनी केली.

रस्त्यांचा दर्जा चांगला राहण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन या सर्वांनी जबाबदारी घेण्याची गरज ही आमदार पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, कोरोना काळात कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. या निधीतून कायमस्वरूपी सुविधा उभारण्याबाबत शिक्षकांसोबत बैठक घ्यावी आणि शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना कमी दरात चाचण्या आणि इतर आरोग्य सुविधा मिळतील, यासाठी कायमस्वरूपी केंद्र उभारण्याबाबत आमदार पाटील यांनी सूचना केली.

महाराष्ट्रातील संत आणि महापुरुषांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांमध्ये माहिती आणि उपक्रम राबवण्याची परवानगी देण्याची मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली. डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपने स्वतःच्या निधीतून महापालिकेला १ हजार ५५० पथदिवे उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आभार मानले.

पुढील दहा दिवसांत गरज असलेल्या ठिकाणी पथदिवे बसवण्यासाठी नियोजन करण्यात येईल. कोल्हापूर शहरात अतिक्रमण, पाणी, स्वच्छता यासह विविध समस्या आहेत. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण सभागृह प्रयत्नशील असल्याचे आयुक्त डॉ. भारूड यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते राजेंद्र लाटकर यांनी, महापालिकेला सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे आभार मानले.

या कार्यक्रमाला  अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक सुभाष बुचडे, राहुल माने, प्रवीण केसरकर, दुर्वास कदम, अमर समर्थ, अर्जुन माने, प्रवीण सोनवणे, सचिन शेंडे, विनायक फाळके, दिपाली घाटगे, सुषमा जरग, जयश्री कांबळे, अरुणा गवळी, स्वाती कांबळे, सालीया बागवान, दिलशाद मुल्ला, रोहित कवाळे, विशाल गवळी, संदीप बिरांजे, वेदवती मोहिते यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, अधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top