‘हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर...’: लाडकी बहीण योजनेवर आ.जयंत पाटील यांची टीका
सांगली – राज्यातील लाडकी बहीण योजनेमधून नुकताच ८० लाख लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत यावर आ. जयंत पाटील यांनी, उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका राज्य सरकारवर केली आहे.
त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे कि, “लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे. देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती, असे म्हटले आहे.