राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना बालमृत्यूबाबत महत्वाचा आदेश
मुंबई – राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, प्रसूतिगृहे, बाल रुग्णालये आणि इतर खासगी आरोग्य संस्थांना बालमृत्यूबाबतची नोंदणी आरोग्य व्यवस्थापनकडे करणे बंधनकारक केले आहे. या आदेशामुळे राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना सर्तक रहावे लागणार आहे.
या आदेशानुसार सर्व खासगी रुग्णालयांना प्रत्येक बालमृत्यूची माहिती २४ तासांच्या आत स्थानिक सार्वजनिक आरोग्य संस्थेला कळविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारी रुग्णालयांमधून बालमृत्यूंच्या अचूक नोंदी केल्या जात असल्या तरी खासगी रुग्णालयांमध्ये नोंदी अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने राज्य सरकारने नोंदणीचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व खासगी प्रसूतिगृहे, मॅटर्निटी होम, बाल रुग्णालये, मल्टी स्पेशालिटी रुग्णालये, अशासकीय रुग्णालये आणि ज्या सर्व खाजगी आरोग्य संस्थांमध्ये बालमृत्यू होतात, त्यांना हे नियम लागू राहणार आहेत.