राज्यात १ डिसेंबरपासून ‘चलान अभय योजना’ लागू
कोल्हापूर – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक वाहनधारकांकडे ई-चलनांचा दंड प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या अंतरिम आदेशामध्ये केवळ मोठ्या प्रमाणात ई – चलने जारी करणे पुरेसे नसून, त्याव्दारे आकारण्यात आलेल्या दंडाची प्रत्यक्ष वसुली करणे आवश्यक असल्याचे मत स्पष्टपणे नोंदवले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा दंड वसूल करण्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. तीन टप्प्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या योजनेचा पहिला टप्पा म्हणजे २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जारी झालेल्या आणि प्रलंबित असलेल्या पात्र ई-चलनांवर २० टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, योजनेच्या प्रारंभापासून ३० दिवसांच्या आत दंड भरावा लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १ डिसेंबर २०२६ पासून पुढे जारी होणाऱ्या पात्र ई-चलनांवरही २० टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, चलन बजावल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत दंड भरल्यास या सवलतीचा लाभ मिळणार आहे. ही सवलत ३० नोव्हेंबर २०२७ पर्यंत लागू राहणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या काळातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलनांवरही २० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, परिवहन विभागाने जारी केलेली चलने या योजनेच्या कक्षेत येणार नाहीत. तसेच रद्द झालेली, निकाली निघालेली किंवा काही विशिष्ट अपात्र गुन्ह्यांचा समावेश असलेली चलने या सवलतीसाठी पात्र ठरणार नाहीत.




