परिवहन मंत्र्यांची एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना निर्देश
मुंबई – राज्यात एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी राबवण्यात येणाऱ्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या प्रक्रियेबाबत आता लवकरच सर्व माहिती समोर येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा, असे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या विविध वृत्तांच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्पाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत राबविण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रियेची माहिती तसेच संबंधित कागदपत्रे तातडीने सादर करण्याचा आदेश दिला आहे.
त्यानुसार, निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत घेण्यात आलेले निर्णय व प्रशासकीय मान्यतेचे आदेश, निविदेतील अटी-शर्ती, तांत्रिक व आर्थिक पात्रतेचे निकष, निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांचे देकार (Bids), त्यांची तुलनात्मक माहिती, तांत्रिक छाननी व आर्थिक मूल्यमापनाचे अहवाल, निविदा मूल्यांकन समितीचे इतिवृत्त, संबंधित कंपनीच्या निवडीसाठी अवलंबिण्यात आलेले निकष आणि अंतिम निवडीसंबंधीचे निर्णय आदी कागदपत्रेही सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
याशिवाय निविदा मंजुरी, कार्यादेश, करारनामा, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील महत्त्वाचे दस्तऐवज, स्मार्ट कार्डची किंमत निश्चित करण्याची प्रक्रिया, महामंडळ आणि संबंधित कंपनी यांच्यातील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, महसूलविषयक अटी तसेच या प्रकल्पासंदर्भातील पत्रव्यवहार, प्रशासकीय मान्यता आणि संचालक मंडळाचे ठराव यांचीही माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची पारदर्शकता तपासली होणार आहे.
मागविण्यात आलेली सर्व माहिती कोणतीही दिरंगाई न करता संकलित करून, संबंधित कागदपत्रांसह आणि आपल्या स्पष्ट अभिप्रायासह अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.




