प्रशासकीय

ग्रीन झोनचे यलो झोनमध्ये रूपांतर करा : तावडे हॉटेल परिसरातील नागरिकांची मागणी

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शहरातील तावडे हॉटेल ते निगडेवाडी परिसरातील २०४ मिळकतींच्या नियमितीकरणाचा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत या परिसराचा समावेश झाल्यानंतर येथील मिळकतधारकांसमोर बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज परिसरातील सुमारे दोनशे रहिवाशांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. २२ एप्रिल २०२६ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा परिसर महापालिका हद्दीत समाविष्ट झाला असला तरी या परिसरातील मिळकती ग्रीन झोनमध्ये येत असल्याने महापालिका प्रशासनाकडून महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम अर्थात एमआरटीपी कायद्याच्या कलम ५२ आणि ५३ अंतर्गत संबंधित बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे नागरिकांनी आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिले. २०४ मिळकती खासगी मालकीच्या जागेवर असून, कोणत्याही शासकीय अथवा महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेले नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यातील अनेक नागरिकांनी १९६० ते २०१३ या कालावधीत या जागांची खरेदी केली आहे. काही शेतकरी कुटुंबं तर अनेक पिढ्यांपासून याच परिसरात वास्तव्याला आहेत. ग्रामपंचायत उंचगावकडून बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या असून, नियमितपणे घरफाळाही भरल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

सध्याच्या ग्रीन झोनचे यलो झोनमध्ये रूपांतर करून नियमानुसार या मिळकतींच्या नियमितीकरणाची प्रक्रिया राबवावी, अशी प्रमुख मागणी रहिवाशांनी केली आहे. अनेक वर्षांपासून या जागांवर वास्तव्याला असलेल्या नागरिकांच्या घरांचा आणि व्यवसायांचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, रहिवाशांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत हे निवेदन आगामी महासभेपुढे ठेवण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले. यावेळी महावीर मसुटे, अनिल मनाडे, बाजीराव मनाडे, अमोल निगडे, उदय मसुटे, किरण मसुटे, नारायण मनाडे, कल्पना मनाडे यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top