इचलकरंजी – शहरातील कचरा संकलनासाठी नव्याने सुमारे २२ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. नव्या मक्तेदारामार्फत येत्या १ ऑक्टोबरपासून घरोघरी घंटागाडी पोहोचणार आहे. या नव्या व्यवस्थेत नागरिकांना ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे देणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी घराघरात डस्टबिनचा वापर करावा लागणार असून, कचरा संकलनाची वेळ आणि घंटागाडी कोणत्या भागात कधी येणार, याची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीतील शासकीय कार्यालये, व्यावसायिक आस्थापना, मंगल कार्यालये, मटण-चिकन दुकाने, पानपट्टी तसेच अन्य दुकानदारांनाही डस्टबिन ठेवणे बंधनकारक केले जाणार आहे. रस्त्यावर साधा कागद किंवा अन्य कचरा टाकताना कुणी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. इंदूरच्या धर्तीवर स्वच्छ आणि कचरामुक्त इचलकरंजी करण्याचा निर्धार महापौर उदय धातुंडे यांनी व्यक्त केला.
या पत्रकार बैठकीला उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, गटनेते विठ्ठल चोपडे, प्रमोद बचाटे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.




