मुंबई – सध्या राज्यात दुष्काळाची तीव्रता खूप जाणवू लागली आहे. यावर बोलताना आ. रोहित पवार यांनी, “बळीराजा दुष्काळाच्या वणव्यात होरपळतोय आणि सरकार सत्तेच्या नशेत धुंद आहे.” असा हल्लाबोल राज्य सरकारवर केला आहे.
आ. रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, यंदा दुष्काळामुळं खरीप पिकं जळून खाक झालं आणि रब्बीची पेरणीही केवळ १७ टक्के (१५-१६ लाख हेक्टर) इतकी निच्चांकी झाली. १९७२ च्या महाभयंकर दुष्काळातही ४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती; यावरुन यंदाचा दुष्काळ किती भयावह आहे, याची कल्पना येते! असं असतानाही सत्ताधारी मात्र केवळ मदतीच्या कोरड्या घोषणा देण्यात दंग आहेत. दुसरीकडं खाजगी सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सक्तीची कर्जवसुली सुरु करुन शेतकऱ्यांच्या गळ्यातला फास आवळायला सुरवात केलीय. त्यामुळं सरकारने केवळ हवेत गप्पा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रूपये आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ हजार रुपये मदतीचा ठोस निर्णय तात्काळ घ्यावा, अन्यथा बळीराजाचा उद्रेक तुमच्या सरकारला कदापि परवडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.




