कोल्हापूर – यंदा कमी पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने एकूण ३०४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. गडहिंग्लज तालुक्याचाही दुष्काळग्रस्त यादीत तात्काळ समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवस आंदोलन सुरू आहे. आज दुष्काळग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज शहरातून या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या मोर्चात सहभाग घेतला. गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चात जय जवान, जय किसान अशा आशयाचे फलक घेऊन अनेक शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील दसरा चौकात हा मोर्चा आल्यानंतर आंदोलकांसह आमदार सतेज पाटील यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आम्ही सप्टेंबर महिन्यापासून राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहोत. शासनाच्या निकषांनुसार ‘ट्रिगर वन’ आणि ‘ट्रिगर टू’ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश झाला. मात्र गडहिंग्लज, कागल, करवीर, हातकणंगले हे तालुके अद्यापही वंचित आहेत. आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ४ तारखेला सर्वेक्षणाचे आदेश दिले आणि कृषी अधिकाऱ्यांनी ६ तारखेला नुकसानीचा अहवाल सादर केला. मात्र, हा अहवाल मंत्रालयात पोहोचायला ११ तारीख का उजाडली? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यांचे प्रस्ताव मंत्रालयात पोहोचले असले, तरी त्यात ७५ टक्के पावसाची अट घातली गेल्याची माहिती मिळत असून ती चिंताजनक आहे. करवीर आणि कागल या तालुक्यांचे अहवालही तात्काळ पाठवून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना आमदार सतेज पाटील यांनी शेतात पीकच आले नसेल, तर शेतकरी कर्जाची परतफेड कशी करणार? कर्जाचे पुनर्गठन करून आजचे मरण उद्यावर ढकलण्यापेक्षा सरकारने सरसकट पीक कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. दुष्काळ जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासह इतर अनेक सवलतींचा लाभ शेतकरी कुटुंबांना मिळू शकेल. दिवाळीसारखा मोठा सण साजरा न करता शेतकरी गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता सर्व पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. या आंदोलनाबाबत संघर्ष समिती जो निर्णय घेईल, त्याला आपला १०० टक्के पाठिंबा असेल आणि यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना तात्काळ पत्र देऊन पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
जर शासनाने यावर त्वरित निर्णय न घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवून आपण स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार सतेज पाटील यांच्या सहभागामुळे या मोर्चाला बळ मिळाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण, अनिरुद्ध रेडेकर, ‘गोकुळ’चे संचालक विद्याधर गुरबे, अंजनाताई रेडेकर, सुनील शिंदे, स्वाती कोरी, नागेश चौगुले, गुंडू पाटील, रामराजे कुपेकर, किसनराव कु-हाडे, संपत देसाई, संजय बटकडली, मल्लिकार्जुन आरबोळे, बसवराज आजरी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभाग घेतला होता.




