Blog

इचलकरंजीत दिवाळी बाजाराचा तिढा कायम..!

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

स्टॉलधारकांच्या जागेचा प्रश्न अनिर्णित

इचलकरंजी – शहरात यंदा मुख्य मार्गावर दिवाळी बाजार भरवण्यावरून प्रशासन आणि व्यापारी वर्गामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गावर बाजार भरवण्याबाबत प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासन, व्यापारी आणि स्टॉलधारकांच्या अनेक बैठका पार पडल्या. मात्र, दिवाळी काही दिवसांवर असतानाही बाजाराची जागा आणि नियोजनाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. आजच्या बैठकीत कल्पना टॉकी ते प्रांत कार्यालय या मार्गावर दिवाळी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, ज्या ठिकाणी महापालिकेची जागा आहे, त्याच बाजूला स्टॉलधारकांनी स्टॉल लावावेत, तसेच स्थानिक रहिवासी आणि स्थानिक व्यावसायिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा ठेवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 महापालिकेच्या जागेवरच एका बाजूला स्टॉल लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे तर दुसरीकडे या मार्गावरील वाहतूक सुरूच राहणार असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने स्टॉलधारक एका बाजूला व्यवसाय कसा करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी थोरात चौकात आपला व्यवसाय करावा, असे आवाहन महापौर उदय धातुडे यांनी केले आहे.

बैठकीत चर्चा आणि वादविवाद होऊनही दिवाळी बाजाराच्या अंतिम नियोजनाबाबत स्पष्ट निर्णय न झाल्याने स्टॉलधारक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. यावेळी उपमहापौर, फेरीवाला समितीचे सदस्य आणि स्टॉलधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top