पर्यटन

दाजीपूरच्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण… जंगल सफारीत वाघाचे दर्शन !

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – दाजीपूर अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून नियोजनबद्ध पद्धतीने जंगल सफारी आयोजित करण्यात येत आहे. सफारीसाठी वाहनांची संख्या मर्यादित आणि निश्चित करण्यात आली असून, सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत निर्धारित वेळेतच पर्यटकांना जंगलात प्रवेश दिला जात आहे. प्रत्येक वाहनासोबत प्रशिक्षित गाईड किंवा मार्गदर्शक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांची संख्या मर्यादित ठेवल्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात होणारा मानवी हस्तक्षेप आणि वाहनांचा त्रास कमी झाला आहे. या सकारात्मक परिणामामुळे आज सकाळी पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले.

दुपारचा काळ वन्यप्राण्यांच्या विश्रांतीसाठी राखीव ठेवून सफारीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तपणे संचार करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षांत अभयारण्य क्षेत्रात गवत, कुरण विकासांची कामे करण्यात आली आहेत. वन्यप्राण्यांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विविध ठिकाणी २० पाणवठे तयार करण्यात आले आहेत. बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपसा करून सौरऊर्जेच्या साहाय्याने या पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. वन्यजीव संवर्धन, अधिवास विकास, पाण्याची उपलब्धता आणि शिस्तबद्ध सफारी नियोजन या उपाययोजनांमुळे दाजीपूर अभयारण्यातील वन्यप्राण्यांना पोषक वातावरण मिळत आहे. परिणामी पर्यटकांनाही विविध वन्यप्राण्यांचे दर्शन घडत आहे.

संबंधित विषय

Scroll to Top