कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमनमळा येथे मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, दुपारी बाराच्या सुमारास प्रत्यक्ष निकाल हाती येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तेवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत दूध उत्पादकांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासूनच मतमोजणी केंद्रावर दाखल होऊ लागले होते. 35 टेबलांवर मतमोजणीला सुरवात झाली असून आवश्यक तयारी पूर्ण झाल्यानंतर ठीक आठ वाजता मतपेट्यांचे सील तोडण्यात आले. त्यानंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली.
गोकुळ दूध संघाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुती आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




