आली गवर आली…सोन पावली आली…..माहेरवाशीण गौराईचं घरोघरी आगमन

पंचगंगाकाठी गौराई पूजनाचा उत्साह

 कोल्हापूर –  लाडक्या गणरायाचे उत्साहात वाजतगाजत स्वागत झाल्यानंतर अवघं वातावरण बाप्पामय झाले आहे. या उत्साहाला अजून मांगल्याची जोड देणाऱ्या माहेरवाशीण गौराईचे आज आगमन झाले. पंचगंगा नदीकाठावर गौरी पूजनासाठी पारंपरिक साज शृंगारात सुवासिनींसह लहान मुलींची मोठी गर्दी पहायला मिळाली.

सुवासिनींनी नदीकाठावर गौरीची विधीवत पूजा करून गौराईची गाणी गायली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, झिम्मा – फुगडीचे फेर धरत गौराईची पावलं घराघरांत उमटली. गौराईचे घरी आगमन झाल्यानंतर गौराईला साडी नेसवून अलंकारांनी सजवण्यात आले. पारंपरिक पद्धतीने गौराईची पूजा-अर्चा करण्यात आली. आज माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला वडी आणि भाजी, भाकरीचा नैवद्य दाखवण्यात आला. गौराईचे आगमन होताच घराघरांत मंगलमय वातावरण निर्माण झालंय. माहेरवाशिणीच्या स्वागतासाठी महिलांमध्ये विशेष उत्साह पहायला मिळाला. आज गौराईच्या आगमनाने आनंदित झालेल्या महिलांनी रात्री झिम्मा – फुगडीवर फेर धरत पारंपरिक गीतं गात गौराईचे कौतुक केले. उद्या घरोघरी शंकरोबाचे पूजन केले जाणार असून शंकरोबाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. शनिवारी दोन दिवसांच्या माहेरवाशीण गौराईचे विसर्जन आणि पाच दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

Scroll to Top